*तुझं माझं जमना... तुझ्या वाचून करमेना...!* *ग्रामपंचायतला विरोध तर बँकेच्या निवडणुकीत हातात- हात*. *अखेरपर्यंत एकीचे बळ टिकणार का...?* *दि.पंढरपूर मर्चंटस बँक निवडणूक*
करकंब /प्रतिनिधी :
-गाव पातळीवरल्या.... गावगाड्यातील ग्रामपंचायतची निवडणूक म्हणजे मोठी रस्सीखेच.. खेचाखेची ओढा -ओढी... एक वेळ "आमदार" नाही होता आलं तरी चालेल... पण ग्रामपंचायतचा किमान "सदस्य" म्हणून तरी कपाळाला "गुलाल" हा लागलाच पाहिजे. या इर्षा आणि याच "सदस्याचा" कपाळी लावलेला गुलाल सत्तेच्या "महत्त्वकांक्षी" पदावर असलेल्या "खुर्चीचा" सन्मान मिळवण्यासाठी रात्रीचा- दिवस करून आणि दिवसाची- रात्र करून प्रचंड मेहनतीने आणि धडपडीने विरोधाला- विरोध करत लक्ष्मीच्या दर्शनाने "सत्ता सुंदरीचा" हार गळ्यात पडला. या गाव गाड्यांच्या ग्रामपंचायत च्या निवडणुकीत एकमेकाला विरोध करत गावाला "विकासाचे" एक नवे "आयकॉन" निर्माण करून स्वप्न साकार करणारे आज मात्र दि. पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रचाराच्या शुभारंभ निमित्त एकत्रित बँकेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आल्याने तुझं माझं जमेना... तुझ्या वाचून करमेना...अशी गावगाड्यातील वाड्या- वस्तीवरील लोकांमधून याबाबत चर्चा होतआहे. जरी ही बँक निवडणूक असली तरी या बँकेचे बहुसंख्य सभासद करकंब मध्ये असल्याने या निवडणुकीच्या निमित्ताने लक्ष्मी दर्शन होणार का...? याबाबत ही चर्चा होत असून ही बँक निवडणूक करकंब मध्ये तरी प्रचंड अटीतटीची निर्माण झाली आहे.
पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंढरपूर या बँकेच्या सन 2022 - 23 ते सन 2027- 28 या कालावधीसाठी सत्ताधारी गटाचे दोन गट पडल्याने अखेर निवडणूक लागली आहे.करकंब मध्ये बँकेची शाखा असल्याने या ठिकाणी एकूण -1098 मतदान आहे.दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह सहकार विकास आघाडी व दि पंढरपूर मर्चंट बँक विकास आघाडी असे दोन पॅनल निवडणूक रिंगणात उभे आहेत. करकंब येथे या बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह सहकार आघाडी या गटाने केला आहे. दरम्यान करकंब येथील स्थानिक विरोधी गटातील सर्व सभासद हे एकत्रित येत मर्चंट को-ऑपरेटिव बँकेच्या निवडणुकीत एकीचे बळ शेवटपर्यंत दाखवणार का...? याकडे करकंब वासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. येथील स्थानिक विरोधी गटातील उमेदवार यांच्या प्रचारार्थ करकंब ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच प्रतिनिधी यांनीही प्रचारात सहभाग घेतला आहे .त्यामुळे स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे.
ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये समोरासमोर विरोधी गट असताना आता मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी सर्व गट एकत्र आल्याने स्थानिक कार्यकर्त्यात वेगळीच चर्चा आहे.त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत रंगत आली असली तरी करकंब मध्ये मात्र स्थानिक राजकारण वेगळ्याच वळणावर जाणार की काय?असे चित्र निर्माण झाले आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत समोरासमोर विरोधात उभे असताना देखील मर्चंट बँकेच्या निवडणुकीसाठी एकत्र आल्यानेही वाड्या- वस्त्यावरील वस्त्यावर तसेच लोकातून बँक निवडणुकीत कोण... कोणाला
मतदान करणार... हे येणारा "काळ" ठरवेल.... अशी ही चर्चा रंगू लागली आहे.