*वाडीकुरोली च्या प्रीती काळे हिची खेलो इंडिया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड*
पंढरपूर/प्रतिनिधी
-दिनांक ४ जून ते १३ जून हरियाणा पंचकूल येथे होणाऱ्या ४ थ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या खो-खो संघात वाडीकुरोली येथील वसंतराव काळे प्रशालेत शिकणारी कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबची अष्टपैलू खेळाडू प्रीती काळे हिची निवड झाली आहे .या स्पर्धेत सहभागी होणार्या महाराष्ट्र राज्याच्या प्रातिनिधीक संघाची निवड चाचणी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे २६ मे २०२२ रोजी झाली. या निवड चाचणीतून महाराष्ट्र राज्याच्या मुलींच्या संघाची निवड करण्यात आली .वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयांत शिकणारी कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबची अष्टपैलू खेळाडू प्रीती काळे हिची निवड झाली आहे .
महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू चा पुरस्कार मिळवणारी प्रीती काळे ही ग्रामीण भागातील असून ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध झाली तर गुणवत्तापूर्ण खेळाडू निर्माण होतात. या अगोदर ०१ खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेमध्ये व ४ राष्ट्रीय स्पर्धेत प्रीतीने महाराष्ट्र संघाकडून खेळताना अष्टपैलू चमकदार कामगिरी केली आहे . क्रीडा शिक्षक प्रशिक्षक प्रा.संतोष पाटील व अतुल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या निवडीबद्दल श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याण काळे सचिव बाळासाहेब काळे स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष समाधानदादा काळे प्राचार्य दादासाहेब खरात सोलापूर अॕम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी अभिनंदन केले.
*चौकट -- ४ थ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी गेल्या जानेवारी महिन्यात निवड चाचणी साठी खो- खो स्पर्धा पुणे येथे घेण्यात आली होती. मात्र राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून हे वाडीकुरोलीच्या या संघातील खेळाडूंना राज्य संघात निवड करताना डावलण्यात आले होते . गुणवत्तापूर्ण खेळाडूंना अन्याय होऊ नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष कल्याण काळे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना याची माहिती दिली. अजित दादा पवार यांनी तात्काळ याची दखल घेत गुणवत्तापूर्ण खेळाडूंवर अन्याय होणार नाही व त्यांना डावलले जाणार नाही यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या कल्याण काळे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आज ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण खेळ असलेल्या अष्टपैलू खेळाडूस राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे.*