*पंढरपूर येथील एम.आय.डी.सी प्रकल्प संदर्भात लवकरात - लवकर कार्यवाही करण्याचे  आश्वासन - आ. समाधान आवताडे*  *राज्याचे उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांना दिले होते मागणीचे निवेदन*

*पंढरपूर येथील एम.आय.डी.सी प्रकल्प संदर्भात लवकरात - लवकर कार्यवाही करण्याचे  आश्वासन - आ. समाधान आवताडे*   *राज्याचे उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांना दिले होते मागणीचे निवेदन*

मंगळवेढा /प्रतिनिधी

: भारताची दक्षिण काशी म्हणून नावलौकिक असणाऱ्या पंढरपूर येथील एम.आय.डी.सी.सारखा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावून कार्यवाही करण्याचे सकारात्मक आश्वासन  उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांनी दिले असल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. आ. समाधान आवताडे यांनी बुधवारी ना. सुभाष देसाई यांची त्यांच्या मंत्रालयीन दालनात भेट घेऊन सदर मागणी करणारे पत्र मंत्री महोदय यांना दिले आहे.


सदर पत्रात आ. समाधान आवताडे यांनी नमूद केले आहे की, अध्यात्मिक आणि सांप्रदायिक यांचा सुरेख संगम असणाऱ्या पंढरपूर शहरने हे संपूर्ण भारत देशात विठ्ठल भूमी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. भक्ती आणि मुक्ती यांची आराधका परमात्मा विठ्ठलापर्यंत वारीच्या रूपाने पोहचविण्यासाठी लाखो वारकरी भाविक पंढरपूर येथे येत असतात. चैत्री, आषाढी, कार्तिकी आणि माघी अशा प्रमुख चार वारीनिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यातून लाखोंचा भक्तीसागर पंढरीत जमा होतो. पंढरपूर शहर व शहराच्या आसपास कासेगाव, वाखरी, लक्ष्मी टाकळी व गोपाळपूर या निमशासकीय गावांची व पंढरपूर शहरची लोकसंख्या जवळपास २ लाखांच्या आसपास आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या कानकोपऱ्याला व इतर राज्यांना जोडणारे अनेक राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे मार्ग, विविध पालखी मार्ग आणि एस. टी मार्गांनी पंढरपूर शहर जोडले गेले असल्यामुळे सदर एम.आय.डी.सी प्रकल्प उभा राहिल्यास येथे उत्पादित होणाऱ्या पक्क्या मालासाठी कच्च्या मालाची मागणी व पुरवठा करणे सोयीस्कर ठरणार आहे. उपलब्ध दळणवळण सुविधेमुळे येथील निर्माण झालेल्या उत्पादनासही मोठ्या शहर बाजारपेठांमध्ये खूप मोठा उठाव मिळणार असल्याचेही आ. समाधान आवताडे यांनी पत्रात सांगितले आहे.


शिवाय शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा पंढरपूरने प्रगतीचा खूप मोठा मनोरा तयार केला आहे. आधुनिक युगात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे मूलभूत ज्ञान अवगत व्हावे यासाठी पंढरपूर येथे ४ अभियांत्रिकी महाविद्यालये, व इतर उच्च शिक्षण देणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थातून अनेक तरुण - तरुणी कौशल्यपूरक ज्ञान घेऊन आपले शिक्षण पूर्ण करतात. परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी व रोजगार यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेकांना मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. अशा पदवी संपादीत व इतर कौशल्यधारकांसाठी व्यवसाय व रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी पंढरपूर येथे एम.आय.डी.सी. प्रकल्प हे खूप मोठे दालन ठरणार असल्याची बाबही आ. समाधान आवताडे यांनी पत्रात समावेशीत केली आहे. त्यामुळे बेरोजगारी सारखा प्रश्न निकाली काढण्यासाठी हा एम. आय. डी. सी प्रकल्प होणे खूप आवश्यक असल्याचेही आ. समाधान आवताडे यांनी उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सदर मागणीचा सकारात्मक विचार करून यासंदर्भात लवकरात - लवकर योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन मंत्री महोदय यांनी दिल्याचे आ. समाधान आवताडे यांनी सांगितले आहे.