*विठ्ठल परिवार दत्तक घेवू: ना.फडणवीस* *एक वर्षाच्या आतच राष्ट्रवादीला विसरत भाजपला दिली साथ* *पहिल्याच सभेत चेअरमन अभिजीत पाटील यांना फडणवीस यांचे मन जिंकण्यात यश*
पंढरपूर/प्रतिनीधी
भाजपकडून नेहमीच चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याची पद्धत आहे. त्यामुळे साखर कारखानदारीत खरोखरच चेअरमन अभिजीत पाटील चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे इथून पुढील काळात त्यांच्या मनातील सर्व गोष्टींची तर पूर्तता करू, याबरोबरच यापुढील काळात याच विठ्ठल परिवाराला दत्तक घेवून सर्व अडचणी दूर करू असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
पूर्वीपासून भाजपचा द्वेष करणारा विठ्ठल परिवार आहे. यापूर्वी कधीही खा. शरद पवार यांची साथ सोडल्याचे पहावयास मिळाले नव्हते. विठ्ठल कारखान्यावर सत्तांतर होताच विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी ५ जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर तब्बल 11 महिन्यानंतर पुन्हा विठ्ठल कारखान्यावर सत्तांतर घडले असल्याचे पाहावयास मिळाले.अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील माजी संचालक मंडळाने राज्य बँकेकडून 435 कोटी रुपयाचे कर्ज घेतले याची परतफेड केली नसल्याने, ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राज्य बँकेने विठ्ठल कारखान्यावर कारवाई करून साखरेचे तीन गोडाऊन सील केले. यामुळे शेतकऱ्यांना उसाची रक्कम द्यावयाची असल्याने साखरेची विक्री करणे गरजेचे होते. राज्य बँकेने केलेल्या कारवाईतून तोडगा काढण्यासाठी चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन मदत करण्याची मागणी केली. तेव्हा फडवणीस यांनी आम्ही तुम्हास मदत करतो, तुम्ही आम्हास मदत करा. असे सांगितले यास अभिजीत पाटील यांनी होकार दिला .यामुळे राज्य बँकेने कारखान्यावर केलेली कारवाई मागे घेण्यात आली.
आज प्रचाराच्या अंतिम दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत ५ मे रोजी कारखान्यावर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात चेअरमन अभिजीत पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले. 11 महिन्यापूर्वी चेअरमन अभिजीत पाटील यांनी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आता त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाले असून सोलापूर जिल्ह्यातील राजकारण बदलणार आहे. अभिजीत पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला असल्यामुळे सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना याचा कितपत फायदा होणार आहे. याकडेही लक्ष लागून राहिले आहे.
चौकट
*माढा मतदार संघावर विशेष लक्ष*
ना. देवेंद्र फडणवीस यांचेसाठी माढा मतदार संघाची निवडणूक महत्वाची आहे. यापूर्वीही त्यांनी या मतदार संघात सभा घेतल्या आहेत. प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही त्यांनी माढा मतदार संघात सभा केली आहे.
चौकट
*गर्दीचे रूपांतर मतात होणार का?*
विठ्ठल परिवार हा कायम खा. शरद पवार यांना मानणारा आहे. मात्र चेअरमन अभिजीत पाटील यांनी याच विठ्ठल परिवाराचा पाठिंबा भाजपला जाहीर केला आहे. मात्र या सभेसाठी आलेली गर्दी ही भाजपला साथ देणार का? याबाबत तालुक्यातून विविध प्रकारची चर्चा सुरू झाली आहे.