*दिलीप धोत्रे यांच्या दमदार पेरणीला धाडसी नेत्यांचीच साथ हवी* *पंढरपूर नागरपालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी जोरदार तयारी*
पंढरपूर/, प्रतिनिधी
पंढरपूर नगरपालिका निवडणूक कार्यक्रम सुरूच राहील अशी अपेक्षा व्यक्त करीत ,मनसेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे यांनी निवडणुकीत मोठया ताकदीने उतरण्याची तयारी सुरू ठेवली आहे. आपण समविचारी लोकांना सोबत घेऊन ही निवडणूक लढविणार असल्याचे जवळपास मागील वर्षांपासून जाहीर केले आहे. त्या पद्धतीने धोत्रे यांनी आपली पेरणीही मोठया प्रमाणात केली आहे. अशातच आता या पेरणीची अवस्था दिसून येणार आहे.
पंढरपूर नगरपालिका काही कालावधी सोडला तर परिचारक यांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्यावरती अजून एकदा सत्ता परिवर्तन करण्यासाठी तयारी सुरू असल्याचे दिसत आहे.
दिलीप धोत्रे यांनी मागील दोन वर्षात सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून बरीच मदत केली आहे. त्यांचे नावही केवळ पंढरपूरच्या नाही तर सोलापूर जिल्ह्यातील घराघरात पोहचले आहे.
दिलीप धोत्रे यांनी निवडणूक लढविण्यासाठी तयारी केली असली तरी त्यांच्या मनसे ची अवस्था पाहता तगडे उमेदवार सध्या त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे त्यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी यापूर्वीच यामधील इच्छुक आणि विद्यमान नगरसेवक यांच्या बरोबर अनेक कार्यक्रम आणि आंदोलने केली आहेत. तेव्हापासून दिलीप धोत्रे ही निवडणूक लढविणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
आजवरचा पंढरपूर येथील राजकीय इतिहास पाहता पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण असो अथवा शहरातील निवडणूक असो यामध्ये पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार अशी दोन गटामध्ये निवडणूक झाल्याचे दिसून आले आहे. पंढरपूर शहरातही परिचारक यांच्या पांडुरंग साखर कारखाना सह विविध संस्थेचे पदाधिकारी आणि कामगार आहेत. तर विठ्ठल परिवारातही विठ्ठल कारखान्यातील कामगार आहेत. या सर्व गोष्ठीमुळे सर्व निवडणुका या विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार यामध्येच पार पडलेल्या आहेत.
विठ्ठल परिवाराचा आजवरचा राजकिय इतिहास पहिला तर विठ्ठल कारखाना हे मुख्य सत्ता केंद्र आहे. यामुळे जो कोणी चेअरमन असतो तोच विठ्ठल परिवाराचे प्रमुख असतो. त्यामुळे पंढरपूर नगरपालिका निवडणूक लढविण्यासाठी तयारीत असलेल्या दिलीप धोत्रे यांना विठ्ठलचे अभिजीत पाटील यांना मानाचे स्थान दिल्याशिवाय परिचारक यांच्या विरोधात तगडे आव्हान होऊ शकत नाही हे मात्र नक्की आहे.
दिलीप धोत्रे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपले नाव पंढरपूर शहरात उमठविले आहे. त्यांनी केलेल्या पेरणीला चांगला वापसा आणायचा असेल तर या नगरपालिकेच्या निवडणुकीतही विजय मिळवून घ्यायचाच ही पक्की मानसिकता असणाऱ्या नेत्यांसोबत जाणे आवश्यक आहे. त्यामुळे दिलीप धोत्रे आता कशी मोट बांधणार यावरच त्यांचे नगरपालिका वरील सत्ता परिवर्तनाचे स्वप्न ठरणार आहे .