*कोऱ्या एग्रीमेंटवर सह्या मागणारे युवराज दादांवर टीका करताहेत - ॲड. दीपक पवार

*कोऱ्या एग्रीमेंटवर सह्या मागणारे युवराज दादांवर टीका करताहेत - ॲड. दीपक पवार

पंढरपूर /प्रतिनिधी

विठ्ठल कारखान्यासाठी दोन वर्षात २१७ कोटी रुपये आले. कारखाना सुरुच झाला नाही.आता युवराज पाटील यांच्या नांवे खडे फोडण्याचे काम विरोधक करत आहेत. याचा ॲड. दीपक पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. १०० कोटी रुपये, कर्ज घेण्यासाठी युवराज पाटलांपुढे कोरे एग्रीमेंट ठेवण्यात आले होते. यामध्ये कोणाकडून कर्ज घ्यायचे त्याचे नांव नव्हते.
मात्र पूर्ण न होऊ शकणाऱ्या अटींचा उल्लेख होता. मग कारखाना कोणाच्या घशात घालावयाचा होता ? असा परखड सवाल ॲड. दीपक पवार यांनी प्रचार सभेत केला. या वेळी युवराज पाटील , गणेश पाटील यांच्यासह करकंब परिसरातील नेतेमंडळी उपस्थित होती.

विठ्ठल कारखान्यास कर्ज मिळू न देण्याचे काम युवराज पाटील यांनी केले, असा अपप्रचार चेअरमन भगीरथ भालके प्रचार सभांमधून करत आहेत. याचा खरपूस समाचार दीपक पवार यांनी करकंब येथील प्रचार सभेत घेतला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, युवराज पाटील यांच्यापुढे ठेवण्यात आलेले एग्रीमेंट कोरे होते. यामध्ये कर्ज देणार्‍या संस्थेचे नांवही नमूद नव्हते. यावर चढ म्हणून वेगवेगळ्या अटी आणि शर्ती लादण्यात आल्या होत्या. ठराविक काळात अमुक पोती साखर उत्पादित करून देण्याची शर्थ होती. ही शर्थ कारखाना पुरीचं करू शकत नव्हता. अटी आणि शर्ती पुऱ्या न झाल्यास , कारखान्याचे व्यवस्थापन या कंपनीच्या ताब्यात जाणार होते. मग हा कारखाना कोणाच्या घशात घालावयाचा होता? असा प्रतिप्रश्न ॲड. दीपक पवार यांनी याप्रसंगी केला.

यावर पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, कर्ज मिळूनही कारखाना सुरू न करणे, पुढील कर्जासाठी संचालकांवर दबाव आणणे, यासारखे प्रकार चेअरमनकडून होत होते. कारखाना पद्धतशीरपणे खाजगी करण्याचा हा एक डाव होता. म्हणूनच युवराज पाटील यांनी त्यावर सही केली नव्हती. हिम्मत असेल तर ते एग्रीमेंट समोर आणा, असे आवाहन त्यांनी भगीरथ भालके यांना केले.


चौकट

२१७ कोटी रुपयांचे कर्ज मिळूनही , कारखाना सुरू केला नाही. आणखी कर्ज मिळवण्यासाठी खाजगी कंपनीचा मार्ग अवलंबण्यात आला होता. विठ्ठल कारखाना कायदेशीर पद्धतीने ठेकेदाराच्या गळ्यात बांधण्याचा दाव भगीरथ भालके यांनी आखला होता. आणि हीच मंडळी युवराज दादांनी कर्ज मिळण्यात आडकाठी आणल्याचा अपप्रचार करत आहेत, सभासदांनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ॲड. दीपक पवार यांनी सभासदांना केले.